बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : आज भाजप बुलढाणा जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा भाजप कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
या वेळी बुलढाणा जिल्ह्यातील आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता ताई महाले, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार तोताराम कायंदे, घाटावरील जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, विनोद वाघ, घाटाखालील जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह विविध स्तरांवरील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, केंद्रप्रमुख तसेच भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याला एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या इमारतीमुळे भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळणार असून कार्यकर्त्यांसाठी हे कार्यालय संवादाचे, नियोजनाचे आणि जनतेच्या सेवा केंद्राचे माध्यम ठरणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा भाजपने उत्कृष्ट नियोजन केले होते. उपस्थितांनी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचे स्वागत करताना जोरदार जल्लोष केला.
Social Plugin