बुलडाणा (जिमाका): पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर अनुदानावर विविध योजना राबविण्यात येतात, या योजनाचा लाभ घेण्यासाठी दि. 2 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अमितकुमार दुबे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत 3 मे पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 2 जूनपर्यंत ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. दि. 25 ते 27 जून या कालावधीत लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता केली जाईल. 2 जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी अर्जासोबत स्वतःचा मोबाइल नंबर द्यावा. त्याच मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर, त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS या ॲप्लिकेशनद्वारे भरता येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. (युवा क्रांती वृत्तसेवा)
Social Plugin