Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

माऊली फाट्यावर भीषण अपघात... दोन नातवंड जागीच ठार, तर आजोबा-आजी गंभीर जखमी, संतप्त जमावाने रेतीचे टिप्पर पेटविले!

जळगाव जा (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने मागून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन लहान बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या आजी-आजोबांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे ९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. 
प्रकाश महादेव खेडकर व साधना प्रकाश खेडकर हे दांपत्य, त्यांच्या दोन नातवंडांसह पळशी सुपो येथून शेगावकडे मोटरसायकलने प्रवास करत होते. माऊली फाट्याजवळील भेंडवळ जवळ टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ६ वर्षीय पार्थ चोपडे (राजापेठ, अमरावती) आणि ५ वर्षीय युवराज मोहन भागवत (बडनेरा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आजी-आजोबांना गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस आणि खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. स्थानिक नागरिकांनी गंभीर अपघातामुळे संताप व्यक्त करत टिप्परला आग लावून निषेध नोंदवला आहे.
 या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संबंधित टिप्पर चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.