बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी याकरिता एकदिवसीय “भव्य आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री” चे आयोजन करण्यात आले आहे. येथील कृषि विज्ञान केंद्र, अजिंठा रोड येथे बुधवार दि. 28 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंबा प्रदर्शनीमध्ये विक्रीकरिता उपलब्ध राहिल. या प्रदर्शनीचा आंबा उत्पादक व आंबा प्रेमी यांनी लाभ घ्यावा.
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा हे नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून आजवर करत आहे. याचाच एक भाग म्हणून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, तसेच जिल्ह्यातील स्थानिक जातिवंत आंब्यांचे संवर्धन व्हावे याकरिता आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पं.दे.कृ.विद्यापीठचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे राहणार आहेत. विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तसेच विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे आदी उपस्थित राहणार आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये
स्थानिक आंबा जातींची ओळख व संवर्धनसंदर्भात मार्गदर्शन, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापन, तज्ञाचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ. या महोत्सवाला व प्रदर्शनीला शेतकरी बांधवांनी व जिल्हावासियांनी बहुसंखेने सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी केले आहे.
Social Plugin