शेगाव (युवा क्रांती वृत्त सेवा): श्री संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाने पावन संत नगरी शेगाव नगरपरिषदेसाठी मागील वर्षभरात पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये स्वच्छता विषय उपक्रमांमध्ये नगरपरिषद शेगाव ने घवघवीत यश संपादन केले असून 9948 गुणांसह जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा व अमरावती विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 56 नगरपरिषदांपैकी शेगाव नगरपरिषद प्रथम क्रमांकावर आली असून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विभागातील प्रथम बक्षीस साठी पात्र ठरली आहे.
शेगाव नगर परिषदेकडे भूयारी गटार योजना, घनकचरा प्रक्रिया केंद्र ,ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती ,ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व इतर अनेक जनजागृती व स्वच्छता विषयक उपक्रम राबवण्यामुळे या सर्व प्रकारात आघाडी घेतली आहे.
मागील तीन महिन्यापूर्वी देशभरातील पाच हजार शहरांमध्ये गुप्तपणे स्वच्छ सर्वेक्षण कामकाजाची पाहणी करण्यात आली. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून सदर पाहणी पार पडली. यामध्ये नागरिकांशी थेट संवाद थेट, कामकाज व सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.त्या अनुषंगाने नगरपरिषदेने 9948 गुणांकन प्राप्त करत बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत अमरावती विभागातून सुद्धा नगरपरिषद श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे नगरपरिषद विभागीय व जिल्हा पातळीवरील बक्षीससाठी पात्र ठरली असून विकास कामाकरिता करोडो रुपयांचा निधी यामुळे शेगाव शहरात प्राप्त होणार आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये व मार्गदर्शनामध्ये तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता संजय मोकासरे यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य निरीक्षक कपिल धेंडूदे, समाधान जायभाय, सिटी कॉर्डिनेटर गीतांजली शास्त्री, सर्व नगरपरिषद विभाग प्रमुख, कर्मचारी , बीट जामदार,सर्व सफाई कर्मचारी व कंत्राटदार कर्मचारी या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व शहरवासीयांनी व विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पाठबळामुळे वेळोवेळी दिलेल्या पाठिंबा मुळे सदर यश शक्य झाल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे व अभियंता संजय मोकासरे यांनी सांगितले.
शेगावच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .यापूर्वी सुद्धा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नगरपालिका शेगाव देशातून फास्टेस्ट मुव्हर सिटी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरली होती व मागील वर्षी राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित झाली होती हे विशेष.
संत नगरी शेगाव मध्ये दररोज वाढत्या तरंगत्या लोकसंख्येमुळे व भाविक भक्तांच्या गर्दीमुळे नगरपरिषदेवर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ताण येत असल्या वर सुद्धा नगरपरिषदेने कमी मनुष्यबळ व कमी साहित्याचे वापर करून सदर उपक्रम यशस्वी केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा जनजागृती व कचरा विषयक काम बिनचूकपणे करण्याचे नियोजन व प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांनी बोलताना सांगितले.
● बचत गट महिला, साने गुरुजी सांस्कृतिक मंडळ पातूर व सर्व जनजागृती कंत्राटदार यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली.
● 5000 शहरांपैकी देशभरातून 40 वा क्रमांक व 358 राज्यातील नगरपरिषदांमधून 21वा क्रमांक पटकावला आहे
● आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विविध योजना व स्वच्छता विषयक मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणून कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
त्यांचे मार्गदर्शनात विविध योजना राबविण्यात येत आहेत.
Social Plugin