लम्पी आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी उपाययोजना राबवावी
बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) :जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुपालकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पशुपालकांनी शिफारशीत उपाययोजना करून या विषाणूजन्य रोगापासून जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यसाय डॉ.अमितकुमार दुबे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मलकापुर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव व चिखली या तालुक्यांमध्ये गोजातीय पशुधनामध्ये लंपीचर्मरोग सदृश्य लक्षणे आढळुन आलेली आहेत. लंपीचर्मरोग हा आजार विषाणुजन्य आजार असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रण वेळीच करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 60 हजार 815 गोवर्गीय पशुधन असुन 3 लक्ष 16 हजार 500 लंपीचर्मरोग प्रतिबंधक लसमात्रांचा पुरवठा उपलब्ध असून लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. सध्या मलकापुर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व खामगाव या तालुक्यातील बाधीत जनावरांचे रोगनिदानाकरीता नमुने रोग अन्वेषण विभाग पुणे येथे सादर करण्यात आले होते. सदर नमुन्यांचा निष्कर्ष होकारार्थी आलेले असल्याने रोगाचा प्रसार इतर तालुक्यांमध्ये होवु नये, या करीता प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे.
रोगाचे कारण व प्रसार
लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) हा एक विषाणूजन्य चर्मरोग असून, तो कॅप्रीपॉक्स व्हायरसमुळे होतो. रोगाचा प्रसार प्रामुख्याने चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या माध्यमातून, बाधित व निरोगी जनावरांच्या संपर्कातून, नाक-डोळ्यातील स्त्राव, तोंडातील लाळ चाऱ्यावर व पाण्यावर लागल्यास संसर्ग होतो. या रोगाचा सर्व वयोगटातील जनावरांवर परिणाम होतो, मात्र लहान वासरे अधिक प्रभावित होतात. उष्ण आणि दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक असल्याने पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढतो.
लक्षणे
ताप येणे व दुध उत्पादनात घट, डोळ्यातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज, त्वचेवर गाठी (१०-५० मिमी व्यासाच्या), मुख्यतः डोके, मान, पायावर, फुप्फुसदाह, कासदाह, गर्भपात व प्रजनन क्षमतेत घट, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होणे या रोगाचे लक्षणे आहे.
उपचार व घरगुती उपाय : प्रतिजैविके, ज्वरनाशक, जीवनसत्त्वे (A व E) व शक्तिवर्धक औषधांचा वापर, त्वचेवरील व्रणांवर फ्लाय रिपेलंट स्प्रे, तोंडातील व्रणासाठी २% पोटॅशियम परम्यांगनेट द्रावण व बोरोग्लीश्रीन.
घरगुती उपाय
१० खायची पाने, १० ग्रॅम मीरे, १० ग्रॅम मीठ यांची पेस्ट करून त्यात गूळ मिसळून जनावरांना द्यावी, पहिल्या दिवशी दर ३ तासांनी, दुसऱ्या दिवशीपासून दिवसातून ३ वेळा १५ दिवसपर्यंत, जखमांमध्ये किडे पडल्यास खोबरेल तेलात कापूर, सीताफळाच्या पानांचा लेप लावावा.
रोगनियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय
बाधित व निरोगी जनावरांना वेगळे ठेवावे, एकत्रित चारा-पाणी देऊ नये, जनावरांचे गोठयांमध्ये 2 टक्के सोडीयम हायपोक्लोराईड द्रावण 20 मिली प्रति लिटर किंवा 2 टक्के फिनाईल द्रावण 30 मिली प्रति लिटर किंवा 1 टक्के फॉरमॅलीन 10मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी केल्यास गोठयामधील किटकांचे निर्मुलन करता येईल. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करावे, गोठा स्वच्छ ठेवणे, माशा व डास यांचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे.
या आजारावर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे असून, पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि नियमित सल्ला घ्यावा. जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Social Plugin