●युवा क्रांती चॅनलद्वारे युवकांना नवी दिशा मिळेल – ना. जाधव
●'युवा क्रांती डिजीटल न्यूज पोर्टल व चॅनल' चा थाटात शुभारंभ
शेगाव जि बुलढाणा : शहरात मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे युवा उद्योजक विजय यादव यांच्या युवा क्रांती डिजीटल मिडीया प्रा.लि. कंपनी व डिजीटल न्यूज पोर्टल व चॅनल'चे लोकार्पण केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आ डाॅ संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली १३ एप्रिल रोजी करण्यात आले.
विजय यादव यांच्या या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच युवकांना नवी दिशा मिळेल, असे प्रशंसोद्वार केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले
रविवारी स्थानिक हॉटेल आठवण येथे खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते व आ.डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकार्पणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे, माजी नगरसेवक रविकांतदादा पाटील, संपादक अविनाश दळवी, ठाणेदार नितिन पाटील,अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश साळुंके, ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार प्रवीण लिंगाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. जाधव पुढे म्हणाले की, युवा क्रांती डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून नैराश्यात गेलेल्या युवकांना नवीन संधीची माहिती मिळेल आणि ते योग्य दिशेने मार्गक्रमण करतील. युवकांना मार्गदर्शन करून उद्योगधंद्याकडे वळविणे, नैराश्यातील युवकांना प्रोत्साहन देणे व शुन्यातून ज्यांनी विश्व निर्माण केले अशा लोकांचे उपक्रम व मुलाखती युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून दाखविल्या गेल्यास नक्कीच युवकांमध्ये क्रांती घडून येईल, याचा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. आपल्या भाषणातून त्यांनी विजय यादव यांच्या प्रगतीपथाचा आलेखही अधोरेखित केला. तसेच विजय यादव यांचे प्रयत्न यशस्वी होवोत, अशा शुभेच्छाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या.
तत्पुर्वी काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले यांनीही आपल्या भाषणातून विजय यादव यांच्या नवीन उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शहरातील असंख्य नागरिकांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.संचलन प्रा डाॅ हरिदास आखरे तर आभार पत्रकार नानाराव पाटील यांनी केले.
● विशेष सन्मान...
अॅड विनोद लांजुळकर, संगणक तंत्रज्ञ अमिनभाई,कॅमेरामन उदय उगले,पत्रकार नानाराव पाटील, अनिल उंबरकार यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
●युवकांना उद्योगधंद्याकडे वळविणे हाच एकमेव उद्देश - विजय यादव
नौकरी न मिळाल्यामुळे दिशाहिन झालेले उच्च शिक्षित युवकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून ते स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्याकडे कसे वळतील, हा युवा क्रांती डिजीटल न्यूज पोर्टल व चॅनलचा एकमेव उद्देश असल्याचे सांगून त्याकरिता चॅनलच्या माध्यमातून युवकांना नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल, असा विचार विजय यादव यांनी आपल्या प्रास्तविकातून बोलून दाखविला.
●तरूणाईच्या भविष्याला बळं देण्याचा उत्तम संकल्प
-आ.डाॅ संजय कुटे
विजय यादव यांनी यांचे युवा क्रांती डिजीटल मिडीया पोर्टल व न्युज चॅनल हे तरूणाईच्या भविष्याला बळ देणारे नव्या युगाचे नवे मिशन असल्याचे उद्गार आ. डॉ. संजय कुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून काढले. यादव यांच्या या पोर्टल व न्यूज चॅनलद्वारा राजकारण, समाजकारण, शिक्षण, स्पोर्टस इत्यादी सर्व विषयांवर युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन होऊन संस्कृती कशी जपली जाईल व सकारात्मकता कशी वाढेल यावर भर द्यावा लागेल, अशी सुचनाही त्यांनी केली. आपल्या भाषणातून आ. कुटे यांनी एआय या नवीन तंत्रज्ञानाबाबतचा उहापोह करताना हे अपरिमित असलेले तंत्रज्ञान किती सिमीत वापरायचे याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
Social Plugin