Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

जलंब मतदार संघाच्या माजी आमदार डॉ. श्रद्धाताई टापरे यांचे निधन; मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!


जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) :
 जलंब मतदार संघातील माजी आमदार श्रद्धा ताई टापरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या जळगाव जामोद येथील रहिवासी होत्या. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रद्धा ताई टापरे या आपल्या संयमित आणि निगर्वी स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी जलंब मतदार संघाचे प्रभावी प्रतिनिधित्व करताना अनेक विकासकामांना चालना दिली होती. त्यांच्या कार्यकाळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

त्यांच्या पश्चात मुलं, नातवंडं आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे. अंजलीताई टापरे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, जेष्ठ आणि मार्गदर्शक नेते हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. विविध पक्षांतील नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यविधीचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी 5.00 वाजता स्व.दादासाहेब टापरे सूतगिरणी जळगांव जामोद येथे होणार आहे.

अभ्यासात हुशार असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले पण राजकारणात आले अन राजकारण , आमदारकीत रमले असे अनेक नेते जिल्ह्यात कार्यरत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही प्रस्थापित डॉक्टर आमदारासह हौशी डॉक्टरही उतरले आहे. ऐंशीच्या दशकातील सक्षम महिला नेत्या श्रद्धा टापरे या जिल्ह्यातील आद्य डॉक्टर आमदार ठरल्या.

जलंब विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार, डॉ. श्रद्धाताई टापरे यांचे निधन झाले आहे. १९८० च्या दशकात त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी विधानभवनात अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले. वारी धरणासह मतदारसंघातील विविध गरजांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोकाची लाट पसरली आहे.

● माजी केंद्रीय मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, खा. मुकुलजी वासनिक यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, "डॉ. श्रद्धाताई टापरे यांच्या निधनाने आम्ही एक अभ्यासू, त्यागी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत." डॉ. टापरे यांच्या योगदानाची आठवण ठेवत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


● तत्कालीन जलंब विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती श्रद्धाताई टापरे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे, त्यांच्या निधनाने मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक असामान्य नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केली.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.


● जलंब विधानसभा मतदार संघाच्या काॅग्रेसच्या माजी आमदार डॉ.श्रध्दाताई टापरे यांच्या निधनाबद्दल अतिशय दु:खद आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडविण्याला त्यांनी अग्रक्रम दिला.बुलढाणा जिल्ह्यात काॅग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांच योगदान महत्त्वपूर्ण होतं.त्यांचे कार्य अजरामर राहिल.अशी प्रतिक्रिया काॅग्रेस चे प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले यांनी दिली.