Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

ऑपरेशन संकल्प: कर्रगुट्टा टेकड्यांवरील ऐतिहासिक यशात सोनाळा येथील श्रावण खोडे यांचा मोलाचा सहभाग



संग्रामपूर जि बुलढाणा (आकाश बोरसे) : छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील कर्रगुट्टा टेकड्यांमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी २१ दिवसांच्या ऑपरेशन संकल्प अंतर्गत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावचा सुपुत्र, जवान श्रावण शेषराव खोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ऑपरेशननंतर ते काल आपल्या कॅम्पमध्ये सुरक्षित परतले.
या ऑपरेशनमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), विशेष टास्क फोर्स (STF), जिल्हा राखीव गट (DRG), बस्तर फायटर्स आणि इतर सुरक्षा दलांच्या सुमारे २४,००० ते २८,००० जवानांनी सहभाग घेतला. कर्रगुट्टा टेकड्यांमध्ये ३००-३५० सशस्त्र नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत ३१ नक्षलवादी ठार झाले असून, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचे कौतुक करताना सांगितले की, "ही नक्षलविरोधी लढाईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे." श्रावण खोडे यांच्या कर्तृत्वामुळे सोनाळा गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या शौर्याने संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचा नव्हे तर मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींना मोठा धक्का बसला असून, या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)