Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

स्व.पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा - माजी मंत्री डॉ. संजय कुटे

माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांची विधिमंडळात आग्रही मागणी

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोद येथील स्व. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाचे गांभीर्य लक्षात घेत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांनी विधानमंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची जोरदार मागणी केली आहे.

डॉ. कुटे यांनी सांगितले की, "स्व. पंकज देशमुख हा माझा लहानपणापासूनचा अत्यंत जवळचा सहकारी होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या मृत्यूबाबत कुटुंबियांच्या आणि माझ्यासह सगळ्यांच्या मनात आत्महत्या की घातपात? असा संभ्रम निर्माण झाला आहे."
याच पार्श्वभूमीवर त्यांनी या प्रकरणाची CID, SIT, CBI किंवा न्यायालयीन न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी सभागृहात मांडली. पंकज देशमुख यांना न्याय मिळावा आणि सत्य जनतेसमोर यावे, यासाठी ही चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या मागणीमुळे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या आपल्या मतदारसंघातील नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे आणि जबाबदारीचे प्रकटीकरण झाले आहे. त्यांनी स्थानिक मुद्दे असोत की वैयक्तिकरीत्या संबंधित असलेली सामाजिक गोष्ट – प्रत्येक बाबतीत शासनाच्या माध्यमातून आवाज बुलंद करत गंभीरपणे भूमिका मांडली आहे.
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात आता अधिकृत व सखोल चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.