Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

पंचाळा येथील शेतकऱ्याचा गौरव; केळीची थेट इराणला निर्यात!

 १५ एकरात केळीचे दर्जेदार उत्पादन; 

धावरून थेट खरेदीला व्यापाऱ्यांची गर्दी


बुलढाणा (प्रतिनिधी): संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा गावातील शेतकरी अनिल देविदास खानझोड यांनी आपल्या १५ एकर क्षेत्रावर केलेल्या केळी लागवडीच्या जोरावर आज एक ऐतिहासिक पाऊल टाकले असून, त्यांच्या केळीचे उत्पादन थेट इराण या विदेशात निर्यात होऊ लागले आहे. दर्जेदार केळीमुळे व्यापारी थेट शेताच्या बांधावर येऊन खरेदी करत आहेत, ही बाब केवळ पंचाळा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरत आहे. 

खानझोड यांनी आपल्या बागेची उत्कृष्ट देखभाल केली असून, सेंद्रिय खते, वेळेवर खतपाणी, तसेच सतत निरीक्षण यामुळे केळीची गुणवत्ता उल्लेखनीय ठरली. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रत्येक टनास रु. १९,००० इतका उच्च दर मिळत आहे. सरासरी ६ टन प्रती एकर उत्पादनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

अधिकार्यांची भेट व प्रशंसा

या उल्लेखनीय यशामुळे २१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी खानझोड यांच्या केळी बागेला भेट दिली. उपस्थित मान्यवरांमध्ये मनोज ढगे (जिल्हा कृषी अधिकारी), मयुरी खलाणे (कृषी उपसंचालक, बुलढाणा), बाळासाहेब व्यवहारे (उपविभागीय कृषी अधिकारी), प्रशांत पाटील (तहसीलदार, संग्रामपूर), रमेश जाधव (तालुका कृषी अधिकारी), संदीप अवचार (मंडळ कृषी अधिकारी), रवींद्र जाधव (सहाय्यक कृषी अधिकारी) यांचा समावेश होता. 

शेतकरी बांधवांकडून प्रेरणा 
अनिल खानझोड यांच्या यशामुळे परिसरातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या बागेला भेट देत आहेत. केळी बागेच्या व्यवस्थापन, खतपाणी नियोजन व निर्यातीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी ते बागेच्या बांधावर येत आहेत. 


स्थानिकांचे सहकार्य

या यशामागे अनेकांची साथ लाभली आहे. पंचाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल खानझोड, पोलीस पाटील भगवान खानझोड, ज्ञानेश्वर देविदास खानझोड, तसेच शिवसेनेचे स्थानिक नेते नंदु पाटील खानझोड यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याचे अनिल खानझोड यांनी यावेळी सांगितले. 

खानझोड यांचा आनंद

“मी खूप मेहनत घेतली आणि आज माझ्या केळी पिकाला चांगले उत्पादन आणि दर मिळत आहेत. माझ्या केळीचा दर्जा पाहून व्यापारी थेट बांधावर येत आहेत आणि निर्यातीसाठी इराणमध्ये पाठवत आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे खानझोड यांनी समाधानाने प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.