Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

राष्ट्रीय सरपंच संसदेची विशेष बैठक उत्साहात संपन्न

पाणीपुरवठा, घरकुल व वस्ती विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा


बुलढाणा
(युवा क्रांती वृत्तसेवा) :
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सरपंच संसदेच्या बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात संपन्न झाली. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, जिल्हा अध्यक्ष गजानन मिरगे आणि जिल्हा समन्वयक रामा पाटील थारकर यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सद्यस्थितीतील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.
पाणीपुरवठा योजनांतील दिरंगाईवर सवाल?

बैठकीदरम्यान रामा पाटील थारकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ४० गावांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर चिंता व्यक्त केली. संबंधित कंत्राटदार वेळेत काम पूर्ण न करू शकल्यास त्यावर कठोर कार्यवाही करावी, अशी प्रभावी मागणी त्यांनी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘बुलढाणा जिल्हा सरपंच संसद’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय सरपंच संसद आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार असून त्यासंदर्भातील निवेदन खरात यांना सादर करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.


घरकुल लाभार्थ्यांना इ-क्लास जमिनीचे दाखले उपलब्ध न होणे आणि यासंदर्भातील प्रशासकीय अडथळे यामुळे योजना रखडत असल्याने, या अडचणी दूर करून लाभार्थ्यांना दिलासा मिळावा, अशी ठोस मागणी थारकर यांनी मांडली. खरात यांनी यावर ८ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन दिले.

दलित वस्ती व तांडा वस्त्यांवरील निधी लोकसंख्येच्या आधारावर समानतेने वितरित व्हावा, यावर थारकर यांनी भर दिला. कोणतीही वस्ती विकासापासून वंचित राहता कामा नये, हा संदेश त्यांनी प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडला.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ. पूनम ताई राठोड, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी बावण, प्रकल्प संचालक सतिश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.डी. तायडे , सरपंच दादाराव लवकर गजानन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.