शेगांव (प्रतिनिधी) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील कामगिरीच्या आधारावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत शासनाचे पणन संचालनालयामार्फत रँकिंग जाहीर झाले.यात शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सलग तिसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्यातील तेरा बाजार समिती मधून पहिला क्रमांक पटकाविला असून विभागामधून सहावा तर राज्यामधून सोळावा क्रमांक पटकाविला आहे.
शेगाव बाजार समिती लहान असून सुद्धा तिने उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली आहे. यावर्षीच्या रँकिंगमध्ये बाजार समित्यांच्या आर्थिक व्यवस्थापन, कामकाज, आणि शेतकऱ्यांसाठी पुरवलेल्या सोयीसुविधा यांसारख्या घटकांचा विचार करण्यात आला. एकूण ३०५ बाजार समित्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या समितीच्या कामगिरीच्या आधारावर ही क्रमवारी आहे.
राज्यातील अनेक बाजार समित्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत चांगली कामगिरी दर्शवली आहे. खाजगी बाजारांची वाढती स्पर्धा लक्षात घेता शेगांव बाजार समितीने आता आधुनिकीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवणे, मालाची गुणवत्ता तपासणे, आणि वेळेवर व्यवहार करणे यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. बाजार समितीने मुख्य बाजार आवारात संगणकीकृत वजन काटे, तसेच ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजार समितीद्वारे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरे, आणि आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. शेगाव बाजार समिती शेतमालाच्या साठवणुकीसाठी 1000 मे टन (गोदाम) आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल योग्य वेळी आणि योग्य भावात विकता येईल. बाजार समितिच्या चांगल्या कामगिरीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि वेळेवर पेमेंटची सोय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
बाजार समित्यांच्या या रँकिंगमुळे चांगली कामगिरी करणाऱ्या समित्यांचे मनोबल वाढले आहे, तर ज्या समित्या मागे राहिल्या आहेत, त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या क्रमवारीमुळे बाजार समित्यांना त्यांच्यातील त्रुटी ओळखण्यास आणि सुधारणा करण्यास मदत होईल. नुकतेच शेगाव बाजार समितीने सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य बाजार आवारात प्रशस्त असे भव्य नवीन प्रशासकीय कार्यालय उभारले आहे. याबाबत राज्यातील बारामती, वर्धा, जिंतूर, कोल्हापूर, मलकापूर खामगाव, मेहकर, गोरेगाव, मालेगाव, माहूर, भिवापूर, पांढरकवडा यांचे सह ४० ते ५० कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सभापती, उपसभापती, सचिव व संचालक मंडळ यांनी शेगाव बाजार समितीला भेट देऊन बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे उपसभापती श्रीकांत तायडे सचिव विलास पुंडकर यांचे सह संचालक मंडळ व कर्मचारी वृंद तसेच सर्व बाजार घटकांचे सर्वत्र कौतुक केले आहे.
Social Plugin