Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्या

जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन
बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 करिता या योजनांअंतर्गत अनुक्रमे 90 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून, एकूण 45 लाख रुपये अनुदान तर बीजभांडवल योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे.
अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याची तरतूद असून त्यापैकी 25 हजार रुपये इतके थेट अनुदान देण्यात येते. बीजभांडवल योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान व नियमानुसार बीजभांडवल देण्यात येते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली कर्ज मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात त्वरीत सादर करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.